षष्ठीपूर्तीचे महत्व जाणून घ्या.

एकसष्ठी, म्हणजेच ६१ वा वाढदिवस. या दिवशी केल्या जाणाऱ्या पुजेला “उग्ररथ शांती” असेही म्हणतात. आपल्या घरातील व्यक्तीच्या वयाची ६० वर्षे पुर्ण झाल्यानंतर हा विधी केला जातो. साठी पार केलेल्या व्यक्तीचे पुढील आयुष्य निरोगी आणि समाधानी जावे तसेच दुःस्वप्न, पिशाच्चबाधा होऊ नये, कोणतेही वियोग सहन करण्याची मानसिक व शारिरीक शक्ती मिळावी व मनःस्वास्थ्य चांगले रहावे हा या शांतीचा मुख्य हेतू. या वेळेस मुख्यदेवता मार्कंडेयऋषी, सप्त चिरंजीव स्थापना, पुजन व अभिषेक केला जातो. तसेच वरील देवतांचा आशीर्वाद प्राप्त करुन घेण्यासाठी व उत्तम निरोगी दिर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी होम-हवन केले जाते. यावेळी तुलादान करण्याचीही प्रथा आहे. विशिष्ठ द्रव्याची तुला केल्यानंतर जमा झालेले धान्य किंवा उपयोगी वस्तू दान दिल्या जातात.


हळद घालुन मळलेल्या कणकेचे एकसष्ट दिवे एका ताटात घेऊन, त्या दिव्यांखाली रुपयाचे नाणे ठेऊन त्या दिव्यांनी त्या व्यक्तीचे औक्षण केले जाते. त्यानंतर श्रेयदान व यजमानाच्या ओटीत प्रसादाचा नारळ घातला जातो.