दीपावली भाग २

मागील भागात आपण वसुबारस व धनत्रयोदशी या दोन सणांची माहिती व महत्व पहिले. यानंतर दिवाळीत येणारे दोन दिवस म्हणजे नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन होय. या दुसऱ्या भागात नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन या दोन सणांचे महत्व वाचूयात.

३. नरक चतुर्दशी :
पुराणात अशी एक कथा आहे कि, नरकासुर नावाचा एक राक्षस देव व मानवांना पीडा देऊ लागला. त्याने अपहरण करून आणलेल्या सोळा सहस्त्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडले असता भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून त्या सर्व राजकन्यांना मुक्त केले. तेव्हा नरकासुराने मरताना श्रीकृष्णाकडे वर मागितला कि, “आजच्या तिथीला जो सूर्योदयापूर्वी मंगल स्नान करेल त्यास नरकाची पीडा होऊ नये.” यामुळे यादिवशी सुगंधित तेल उटणे लावून सूर्योदयापूर्वी मंगलस्नान केले जाते. तसेच पहाटे व सायंकाळी घरात सर्वत्र तेलाचे दिवे (पणती) लावले जातात.


तसेच अपमृत्यु येऊ नये म्हणून यादिवशी दुपारी बारा ते दोन या वेळेत कधीही, पूर्व दिशेस तोंड करून, पाण्यात तांदूळ घालून यमाच्या पुढील १४ नावांनी यमतर्पण करावे. म्हणजे पुढील एकेक नाव उच्चारत सरळ हातावरून ताम्हणात पळीने पाणी सोडत रहावे. (ज्यांना वडील नाहीत अशांनी तांदळा ऐवजी काळे तीळ घालून अंगठ्यावरून पाणी सोडावे.)


१. यमं तर्पयामी २. धर्मराजं तर्पयामी
३. मृत्युं तर्पयामी ४. अंतकं तर्पयामी
५. वैवस्वतं तर्पयामी ६. कालं तर्पयामी
७. सर्वभूतक्षयकरं तर्पयामी ८. औदुंबरं तर्पयामी
९. दध्नं तर्पयामी १०. नीलं तर्पयामी
११. परमेष्ठिनं तर्पयामी १२. वृकोदरं तर्पयामी
१३. चित्रं तर्पयामी १४. चित्रगुप्तं तर्पयामी


याप्रकारे तर्पण करून दक्षिण दिशेस तोंड करून पुढील श्लोक दहा वेळा म्हणावा.
श्लोक : यमो निहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च काल: ।
भूताधिपो दत्त कृतानुसारी कृतांत एतद्दशभिर्ज्यपंति ।।

४. श्री लक्ष्मी पूजन:
दिवाळीमधील सर्वात महत्वाचा असा हा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन होय. अश्विन अमावस्या यादिवशी घराघरात लक्ष्मीपूजन केले जाते. देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून १४ दिवसात १४ रत्न उत्पन्न झाली. त्यामध्ये प्रगट झालेल्या लक्ष्मी देवीने भगवान विष्णूंच्या गळ्यात माळ घालून श्रीविष्णूचरणाशी ती लीन झाली. ऋग्वेदातील उल्लेखानुसार ‘श्री’ व ‘लक्ष्मी’ या दोन देवता होत्या. परंतु पुढे श्रीदेवीने आपले अस्तित्व लक्ष्मीत विलीन केल्याने श्रीलक्ष्मी ही एकच देवता झाली.


श्रीलक्ष्मी ही संपत्तीची, धनधान्याची अधिष्ठात्री देवता असल्याने धनाच्या स्थिरतेसाठी व दारिद्रयनाशासाठी लक्ष्मीची पूजा केली जाते. श्रीलक्ष्मीदेवी अस्थिर व चंचल असल्याने ती आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी अश्विन अमावास्येच्या दिवशी सायंकाळनंतर तिची विधिवत पूजा केली जाते. यावेळी एका नव्या सतरंजी किंवा गालिच्यावर कलशपूजन व घरातील लक्ष्मीची पूजा मांडून, त्यापुढे आपण संचित केलेले धन व दागिने यांची पूजा केली जाते. या पूजेवेळी लक्ष्मीस व सर्व धनधान्य व दागिण्यास हळद कुंकू, धने, अक्षदा फुले, अत्तर याचबरोबर साळीच्या लाह्या, बत्तासे व डाळिंबाचे दाणे वाहिले जातात. श्रीसूक्ताचे पठन केले जाते. श्रीखंड, बासुंदी, पुरी, लाडू, करंजी इत्यादी पक्वान्नाचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते. यावेळी मांडलेल्या पुजेसमोर व घराबाहेर दिव्यांची आरास केली जाते, रांगोळी काढली जाते.


धर्मशास्त्रानुसार केरसुणी किंवा झाडू म्हणजे ‘आरोग्यलक्ष्मी’ समजली जाते. ही आरोग्यलक्ष्मी घरातील अलक्ष्मीला घराबाहेर काढून घरातील धनलक्ष्मी व आरोग्यलक्ष्मी स्थिर करते, म्हणून यादिवशी आवर्जून नवीन केरसुणी अथवा झाडूची पूजा केली जाते. पूर्वी अनेक ठिकाणी या अलक्ष्मीला घरातून हाकलून देण्यासाठी रात्री १२ वाजता घरातील स्त्रिया सूप आणि दवंडी वाजवून त्यांना हाकलून लावत. तसेच काही ठिकाणी आजही रात्री बारा वाजता नव्या केरसुणीने घर झाडून काढण्याची प्रथा आही. इतरवेळी रात्रीच्या वेळी घर झाडणे निषिद्ध मानले जाते.

संदर्भ- धर्मसिंधु, निर्णयसिंधू, दाते पंचांग.