दीपावली भाग एक

दीपावली हा सर्वांचा आवडता सण ! वसुबारस पासून सुरु होणारा हा उत्सव भाऊबीजे दिवशी संपतो . या सणाचे हे सहा दिवस आपण मोठ्या आनंदाने साजरे करतो. परंतु आपल्या धर्मशास्त्रात या प्रत्येक दिवसाचे एक विशिष्ट महत्व सांगितले आहे . ते समजून घेतले तर या सणाचा आनंद द्विगुणित होईल .

१. वसूबारस (गोवत्स द्वादशी)
आपली वेदकालीन संस्कृती हि कृषी प्रधान असल्याने आपल्या अनेक सण उत्सवात गोमातेचे महत्व अधोरेखित करून तिचे पूजन केले जाते .
दीपावलीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस . गाय ही आपल्याला मातेसमान असून आईच्या दुधानंतर आपल्याला गाईच्या दुधाचेच महत्व आहे. अश्या गोमातेचे पूजन करण्याचा दिवस म्हणजे वसूबारस अश्विन महिन्याच्या कृष्ण / वद्य पक्षातील द्वादशीस सवत्स धेनूची म्हणजे वासरासह गाईची पूजा केली जाते .

या दिवशी गाईच्या पायावर पाणी घालून व तिला हळदी कुंकू वाहून औक्षण केले जाते . तसेच गाईस उडीदाचे व इतर धान्याचे वड़े नैवेद्य म्हणून खायला देतात व ‘आमच्या घरात कायम दूध दुभती राहो व आम्हाला सदैव दूध व दुधाचे पदार्थ मिळो’ अशी प्रार्थना करून गाईस प्रदक्षिणा घातली जाते .

२. धनत्रयोदशी
दीपावलीचा हा दुसरा दिवस असून या दिवशी आपल्या घरातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्राचीन गुप्त) धनाची पूजा केली जाते. तसेच या दिवशी वैद्य डॉक्टर) श्री धन्वंतरी देवतेची पूजा करतात .
धर्म सिंधू ग्रंथात सांगितल्या प्रमाणे घरात कोणासही अपमृत्यु येऊ नये म्हणून आपल्या घराच्या बाहेरील बाजूस सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून कणकेचा दिवा लावला जातो व त्यावेळी पुढील श्लोक म्हणून प्रार्थना केली जाते .
श्लोक:
मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह।
त्रयोदशां दीपदानात् सूर्यज:प्रियतां मम ।।