सर्वपित्री अमावास्येचे महत्व

दिनांक २५/०९/२०२२ रोजी रविवारी भाद्रपद अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या आहे.

सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा आणि महत्वाचा दिवस मानला जातो. भारतात बहुतांश भागात सर्वपित्री अमावस्येला महालय अमावस्या सुद्धा म्हणतात.

सर्वपित्री दिवशी कोणाचे श्राद्ध करता येते ?
जी व्यक्ती पौर्णिमा अथवा अमावस्येला मरण पावले असतील अश्या व्यक्तींचे श्राद्ध सर्वपित्रीला केले जाते. तसेच जर वेगवेगळ्या तिथींना मरण पावलेल्या पित्रांचे श्राद्ध त्या-त्या तिथींना करण्यास शक्य झाले नसेल तेंव्हा अशा सगळ्या पितरांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला करतात.
तसेच जर आपल्याला आपल्या पुर्वजांच्या मृत्युची तिथी माहिती नसेल अशा वेळी देखील आपण त्यांचे श्राद्ध या अमावस्येला करू शकतो. यामुळेच या अमावस्येला सर्वपित्री मोक्ष अमावस्या असे म्हणतात.

सर्वपित्रीदिवशी श्राद्ध का करावे ?
श्राद्ध कर्म केले असता धन, धान्य, कीर्ती, समृद्धी, आरोग्य, यश, स्वर्ग , पुष्टी, बल प्राप्त होते.
ह्या दिवशी आपल्या कुळाच्या वृद्धीसाठी, वंशवृद्धी व्हावी म्हणुन सपिंड श्राद्ध केले जाते. म्हणजेच या दिवशी ब्राम्हण भोजन व पिंड दान करून श्राद्ध केले जाते तसेच पुर्वजांच्या स्मरणार्थ तर्पण श्राद्ध , हिरण्य श्राद्ध, चट श्राद्ध सुद्धा केले जाते.
ह्यापैकी काही शक्य नसल्यास पुर्वजांच्या फोटोस नैवेद्य दाखवून पितृअष्टक म्हणावे.

🙏🙏🙏🙏🙏🙏
पितृअष्टक

जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला
पुढे वारसा हा सदा वाढविला
अशा नम्र स्मरतो त्या पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ ||
इथे मान सन्मान सारा मिळाला
पुढे मार्ग तो सदा दाखविला
कृपा हीच सारी केली तयांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || २ ||
मिळो सद् गती मज पितरांना
विनती हीच माझी त्रिदेवतांना
कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ३ ||
जोडून कर हे विनती तयांना
अग्नि वरूण वायु आदी देवतांना
सदा साह्य देवोनी उध्दरी पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ४ ||
वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना
सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना
मुक्तीमार्ग द्यावा ऊध्दरून त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ५ ||
करूनी सिध्दता भोजनाची तयांना
पक्वान्ने आवडीनें बनवून नाना
सदा तृप्ती होवो जोडी करांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ६ ||
मनोभावे पुजूनी तिला, यवाने
विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने
आशिष द्याहो आम्हा सकलांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ७ ||
सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा
न्यून काही राहाता माफी कराना
गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ८ |।