भाद्रपद महिन्यात अनेकांकडे परंपरेनुसार गौरीपुजन केले जाते. या गौरी काहिजणांकडे धातुच्या किंवा मातीच्या स्वरुपात उभ्या तर काहींकडे तांब्यावर, सुगडावर किंवा खड्यांच्या असतात. ज्याच्याकडे पिढ्यानपिढ्या जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे गौरीपूजन करावे. त्यात बदल करु नये.
गौरी आवाहन मुहूर्त
भाद्रपद महिन्यातील गौरी बसवताना / आवाहन करताना त्या नेहमी “अनुराधा” नक्षत्रावर बसविल्या / पुजल्या जातात. अशावेळी वैधृती भद्रा विष्टी राहुकाळ इ.कुयोगांचा दोष नसतो. अनुराधा नक्षत्र असेपर्यंत गौरी बसवल्या जातात. उदा. गौरीआवाहनाच्या दिवशी अनुराधा नक्षत्र जर रात्रीपर्यंत असेल तर संपूर्ण दिवसभरात केव्हाही गौरी बसवल्या जातात. यासाठी विशिष्ट मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. यावर्षी रात्री १०.५६ पर्यंत अनुराधा नक्षत्र असल्याने संपूर्ण दिवसभरात कधीही गौरी आवाहन करावे.
गौरी आवाहनाच्या दुसर्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन होते.म्हणजे बोली भाषेत “गौरी जेवतात”. यादिवशी कुलाचाराप्रमाणे पुजन करुन सवाष्ण जेऊ घालतात.
गौरी विसर्जन
गौरी विसर्जन हे मूळ नक्षत्रावरच होते. यासाठीही विशिष्ट मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. यावर्षी मूळ नक्षत्र रात्री ८ वा. ५ मि. पर्यंत असल्याने रात्री ८ पर्यंत केव्हाही गौरी विसर्जन करावे
संदर्भग्रंथ – दाते पंचांग व निर्णयसिंधु