पुत्रदा एकादशी

आज पुत्रदा एकादशी. विशेषकरुन संततीप्राप्तीसाठी या एकादशीचे व्रत केले जाते.

🚩 पुत्रदा एकादशीच्या दिवशी पुजन कसे करावे ?

सकाळी देवपुजा झाल्यानंतर अथवा माध्यान्हकालापर्यंत या व्रताची पुजा केली जाते. मनातली इच्छा बोलुन श्री कृष्णाच्या मुर्तीवर अक्षदा वहाव्यात. त्यानंतर श्रीकृष्णाच्या मुर्तीला ताम्हणात घेऊन दुध पाण्याचे स्नान घालुन मुर्ती पुसुन देवघरात किंवा एखाद्या चौरंगावर ठेवावी. त्याला अत्तर लाऊन गंध, हळद, कुंकु तुळस फुले वाहुन पुजा करावी. उदबत्ती समई व तुपाचा दिवा लावावा. शेंगदाण्याच्या लाडुचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर श्रीकृष्णास १०८ तुळसीपत्र वहावीत. प्रत्येक तुळसीपत्र वाहताना “ॐ क्लीं कृष्णाय नमः” , या मंत्राचे उच्चारण करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. संपूर्ण दिवस उपास करावा.(फराळ केलेला चालेल)
या दिवसभरात कठोर बोलणे, भांडण करणे टाळावे.

दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे देवपुजा करुन श्रीकृष्णाला तुळस फुले वाहुन पुन्हा मनातली इच्छा बोलावी. गोडाचा (पुरणाचा) नैवेद्य दाखवुन आरती करावी. या दिवशी शक्य असेल तर एखाचे मेहुण (जोडपे) जेवायला घालावे. जर मेहुण जेवायला घालणे शक्य नसेल तर त्यांचे ताट वाढुन ते पान गाईला द्यावे व त्यानंतर आपण उपवास सोडावा.

पुढील मंत्राचा शक्य असेल तेवढा जप करावा.

ॐ देवकी सुत गोविन्द वासुदेव जगत्पते ।
देहि मे तनयं कृष्ण त्वामहम शरणम् गता ॥