दिव्याची अमावस्या

भारतीय सण संस्कृती यांचा निर्सगाच्या चक्राशी तसेच आपल्या जीवनावर होणारा परिणाम याचा एकमेकाशी संबंध असतो. आषाढ- श्रावण ह्या मास पावसाळ्यात येतात. आषाढानंतर श्रावण या अत्यंत पवित्र महिन्याची सुरूवात होते.कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही दीपअमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते.

त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात
‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥


अर्थ:
‘‘हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस.
तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस.
माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’.

दीप अमावस्येला दीप पूजन केले जाते. त्यामुळे घरातील पितळेचे, चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जाते. पाटाभोवती रांगोळी काढली जाते. नैवेद्या दाखवून पूजा केली जाते. आणि प्रार्थना केली जाते की ,
आपल्या सर्वांच्या जीवनातील अंधःकार दूर होऊन सर्वांना उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, शांती, सौख्य लाभो आणि सर्वांचे आयुष्य ज्ञानरुपी प्रकाशाने अविरत तेजोमय होवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना !

आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या. यानंतर श्रावणाची सुरुवात होते. या दिवसाच्या पुर्वसंध्येस घरातील सर्व दिवे समया निरांजने लखलखीत घासून पुसुन ठेवतात तर दुसर्‍या दिवशी म्हणजे दीप अमावस्येच्या सकाळी दीप पूजन केले जाते.

मुहुर्त – या दिवशी म्हणजे दि. २८/०७/२०२२ रोजी पुर्ण दिवस अमावस्या असल्याने सकाळी सुर्योदयापासून केव्हाही दीपपूजन करावे.

👉🏻 दीपपूजन कसे करावे

देवपुजेनंतर एका पाटावर किंवा चौरंगावर घरातील सर्व दिवे/समई/निरांजने तेल तुपाने प्रज्वलित करावीत. त्या पाटासमोर रांगोळी घालावी. त्यानंतर प्रज्वलित केलेल्या दिव्यास हळद कुंकु, कापसाचे गेजवस्त्र, दुर्वा, आघाडा फुले वहावीत. त्यासमोर पान सुपारी विडा व त्यावर पैसा ठेवावा. त्यानंतर घरातल्या देवास आणि प्रज्वलित केलेल्या दिव्यांना ज्वारीच्या लाह्या, साखर, फुटाणे, दूध तसेच पुरणाची पोळी यांचा नैवेद्य दाखवावा.
काही ठिकाणी यादिवशी अग्निवर तवा न ठेवण्याची परंपरा असल्याने त्या कुंटुंबात पुरणाऐवजी बाजरीच्या उकडलेल्या गुळमिश्रीत फळांचा नैवेद्य दाखवतात. पुजलेले दिवे दिवसभर तेवत ठेवतात. या दिवशी संध्याकाळी तेवत असलेल्या दिव्यांसमोर बसुन खालील मंत्र म्हणून घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार करावा.

वरिलप्रमाणे पुजा करुन झाल्यानंतर खालील मंत्रांनी दिव्याची प्रार्थना करतात.

शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोऽस्तु ते।।

दीपो ज्योति परब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन:।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तु ते।।

दीप सूर्याग्नि रूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।
गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥

👉🏻 दीपपूजनाचे महत्व

दिवा हे मांगल्याचे व प्रकाशाचे प्रतिक असल्याने आजच्या विजेच्या काळातही आपण तेल तुपाचे दिवे देवसमोर लावतो. कारण या दिव्यातुन पडणर्‍या तेजस्वी प्रकाशातुन घरातील वातावरण सात्विक व प्रसन्न राहते.

आपल्या हिंदु संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे, आपल्या शरीरातील प्राणालाही “प्राणज्योत” संबोधले जाते. घरातील इडापिडा दूर होऊन अज्ञान, अंधकार व रोगराई दूर करून ज्ञानाचा सात्विक प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते.

सर्वांना दीप अमावस्येच्या मनःपूर्वक शुभेच्छा!