मकर संक्रांत कायम १४ किंवा १५ जानेवारीलाच का येते?

गौरी : अरे वा माई आजी, मकरसंक्रांती निमित्त हलव्याचे किती सुंदर दागिने बनवले आहेस. आजी आपले बाकीचे सण कुठल्या तारखेला येतील ते निश्चित नसते. म्हणजे बघ कधी दिवाळी ऑक्टोंबर मध्ये येते तर कधी नोव्हेंबर. अधिक महिना आला तर अजुन मोठे बदल होतात. पण मकर संक्रांत कायम १४ किंवा १५ जानेवारीलाच येते ते कसे काय ?

Gurujiondemand

माई आजी : गौरी, त्यासाठी तुला हिंदू महिने आणि इंग्रजी महिने समजून घ्यावे लागतील. हिंदू महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्‍या प्रदक्षणेवरून ठरवले जातात. आपले सगळे सण हे तिथी नुसार असतात, म्हणजेच चांद्र कालगणनेनुसार असतात. तर इंग्रजी महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्‍या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. अर्थात ते सौर महिने आहेत. त्यामुळे हिंदू सण कधी कुठल्या इंग्रजी महिन्यात येणार हे बदलत राहते.

आता मकर संक्रांत म्हणजे काय ते समजून घेऊ. मुळात संक्रांत म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो दिवस. सूर्य बारा राशीतून जात असतो त्यामुळे १२ संक्रांत होत असतात. मकर संक्रांत म्हणजे सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस. अशी ही संक्रांती इंग्रजी महिने प्रमाणेच सूर्याशी संबधित असल्यामुळे मकर संक्रांतीची तारीख ही १५ जानेवारी आहे.


गौरी : पण मग कधी १४ कधी १५ जानेवारी असे का ?

माई आजी : पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ती स्वतःभोवती फिरता-फिरता सूर्याभोवती फिरते.पृथ्वी स्वतःभोवती तीच्या अक्षाभोवती फिरते. हा पृथ्वीचा कललेल्या अक्ष देखिल स्थिर नसून २६,००० वर्षांमध्ये तो गोल फिरतो. त्या गतीला ‘परांचन गती’ (इंग्रजीमध्ये तिला Precession Motion) असे म्हणतात. या गतीमुळे ठराविक वर्षानंतर सूर्याला पुन्हा मकर राशीत प्रवेश करण्यास १ दिवसाचा उशीर होतो. म्हणून ही तारीख सुद्धा बदलत असते. कोणी म्हणतो दर ७२ वर्षांनी तर कोणी म्हणतो ८० तर कोणी म्हणतो १०० वर्षांनी हा एक दिवसाचा फरक पडतो. म्हणून कधी १५, कधी १४, कधी १३ जानेवारीला मकर संक्रांत झाली होती.


गौरी : आजी हे उत्तरायण म्हणजे काय ? याचा मकरसंक्रांतीशी काय संबंध आहे ?

माई आजी : हे बघ, पृथ्वी स्वतः भोवती फिरते म्हणजे ती तिच्या थोड्याशा कललेल्या आसाभोवती फिरते आणि त्याचवेळी ती सूर्या भोवती पण फिरत असते. तिच्या आसामुळे काय होते की सूर्याभोवती फिरताना साधारण सहा महिने उत्तर गोलार्धाचा भाग सूर्याच्या जास्त जवळ जात असतो. त्यामुळे त्याकाळात दिवस मोठा आणि रात्र छोटी होताना दिसते. याला “उत्तरायण” म्हणतात. पण हेच जेव्हा दक्षिण गोलार्ध सूर्याच्या जास्त जवळ असतो तेव्हा उत्तर गोलार्धात दिवस छोटा आणि रात्र मोठी होते. याला दक्षिणायन म्हणतात.

२२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस म्हणून ओळखला जातो. या तारखेपासून उत्तरायण सुरू होते. काळोख कमी होऊन उजेड वाढत जातो. असे म्हणतात की सुमारे 2000 हजार वर्षांपूर्वी सूर्याने मकर राशीत प्रवेश केला की, उत्तरायण सुरू होत असे. उत्तरायण सुरू झाल्याचा आनंद म्हणून मकरसंक्रांत सणाच्या रुपात साजरी केली जात असे. हे उत्तरायण सुरू होते तेव्हा सूर्य दक्षिण गोलार्धात 23 1/2 अंशांवर तळपत असतो. म्हणूनच विषुववृत्तापासून 23 1/2 अंशांवर असणाऱ्या अक्षवृत्तास मकरवृत्त हे नाव पडले. ऋतु बदलू लागतो. दिवस मोठा होऊ लागतो. हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरवात होत असते. हिवाळ्यात मिळेल ती उष्णता जास्त प्रमाणात शोषून ऊर्जा मिळवण्यासाठी गडद रंगांचा वापर केला जातो. काळया रंगाचा हा उपयोग तर सर्वश्रुत आहेच. पण इथून पुढे त्याची आवश्यकता नसते. हे दर्शवण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे आणि पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने अंधराकडून उजेडाचे प्रतीक म्हणून वापरले जातात.


गौरी : वा आजी किती छान माहिती दिलीस. आजी मोठ्या रात्री कडून मोठ्या दिवसाकडे जाताना वाटेत लागणारी पहाट कोण माहीत आहे का ?

माई आजी : अरे वा गौरी, सांग बरं ती पहाट म्हणजे काय ?

गौरी : धुंधुरमास !
आजी हा हा कुठला मराठी महिना नाही तर धुंधुरमास म्हणजे सूर्य धनू राशीत असतो तो काळ. रात्र आणि दिवसाच्या मधली पहाट! म्हणूनच तर या महिन्यात पहाटे लवकर उठून शेकोटीची ऊब घेतात, हुरडा खातात, तीळ लावलेली भाकरी, गूळ खाऊन शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. भोगीचा सण म्हणजे धुंधुरमास चा शेवटचा दिवस ! बरोबर की नाई ?

माई आजी : वा गौरी, किती सुरेख वर्णन केलेस ! चल मग ही भौगोलिक माहिती सणाच्या रुपात पुढच्या पिढी कडे सोपवणाऱ्या आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगू आणि साजरी करू मकरसंक्रांत !

© सौ रश्मी साठे उन्हाळे.
परंपरा मंच