विवाह संस्कार

स्त्री व पुरुष दोघांनाही कामेच्छा असते आणि धर्म नियंत्रित केलेले काम म्हणजे विवाह संस्कार होय. विवाह संस्कारामुळे श्रेष्ठ असा गृहस्थाश्रम प्राप्त होतो. तिन्ही आश्रम या  गृहस्थश्रमावर आधारित आहेत. म्हणून गृहस्थश्रम स्वीकारण्याची जी विवाह पद्धती आपल्याकडे सांगितली आहे, ती अत्यंत उत्कृष्ट अशी आहे. देव, अग्नी आणि विद्वान ब्राह्मण यांच्या साक्षीने त्या दोघांनी विवाह बद्ध व्हावयाचे आहे. या या विवाह पद्धतीमध्ये हुंड्यासारख्या पद्धती बंद केल्या पाहिजेत.

असा हा विवाह संस्कार करताना कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे, तर प्रथम कुळाची चौकशी करावी, कन्या देऊन मग कुळाची चौकशी करू नये, असे ज्ञानदेवांनी म्हंटले आहे. बुद्धिवान पुरुषाला कन्या द्यावी. वधू कशी असावी तर बुद्धिवान, रूपवान, शीलवान व निरोगी असावी, तसेच वरा पेक्षा वधू वयाने लहान असावी व जवळच्या नात्यातली नसावी. म्हणजेच मामे,आत्ये,मावस भावंडांमध्ये विवाह करू नका. असे डॉक्टर सुद्धा सांगतात. तसेच सगोत्र विवाह करू नये. तसेच स्वजातीयांमध्ये विवाह व्हावा. पत्रिका पाहून विवाह करावा विवाहाचे आठ प्रकार सांगितले आहेत ते असे,  १) ब्राह्म  २) दैव  ३) प्रजापत्य  ४) आर्ष  ५) गांधर्व  ६) असुर  ७) पैशाच  ८) राक्षस.  कन्यादान करणे हा महत्वाचा विधी आहे. हे कन्यादान केल्याने मागील १२ पिढ्या व पुढील १२ पिढ्या पवित्र व्हाव्यात, असा संकल्प आहे आणि नारायण स्वरूप अशा वराला हि लक्ष्मीस्वरूप कन्या मी देत आहे अशी उदात्त भावना या विधीमध्ये आहे, तसेच धर्म – अर्थ – काम या तीन पुरुषार्थाच्या प्राप्तीकरिता हि कन्या देत आहे, असे वराला सांगितले जाते .