अक्षय्य तृतीया आणि दानाचे महत्व

वैशाख शुक्ल तृतीयेच्या दिवशी अक्षय्य तृतीया हा सण येतो. या दिवशी बुधवार आणि चंद्र रोहिणी नक्षत्रात असेल तर महापुण्यकारक समजला जातो. वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया हे नाव पडण्यामागचे कारण ‘मदनरत्न’ या ग्रंथात सांगण्यात आले आहे,

अस्यां तिथौ क्षयमुपैति हृतं न दत्तं ।
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ॥


श्रीकृष्ण म्हणतात,

हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान हवन क्षयाला जात नाही. म्हणून हिला मुनींनीअक्षय्य तृतीयाअसे म्हटले आहे.’

अक्षय्य तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांतला एक दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. तसेच शुभ कामाला प्रारंभ केला जातो. महाराष्ट्रातील लोक या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानतात. शेतकरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शेतीच्या कामांना प्रारंभ करतात. या सणालाआखेतीअसेही म्हणतात. अक्षय्य तृतीयेसंबंधी एक कथा सांगितली जाते.

प्राचीन काळी शाकल नगरात धर्म नावाचा एक व्यापारी राहत होता. तो रोज ईश्वराची पूजा करत असे. तसेच तो नेहमी सत्य बोलत असे. एके दिवशी एका विद्वानाने त्याला अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य सांगितले. ते ऐकून तो प्रभावित झाला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्याने नदीवर जाऊन स्नान केले. ईश्वराची पूजा केली. पितरांचे स्मरण केले. नंतर त्याने पाण्याने भरलेल्या घटाचे दान केले. अशा रितीने त्याने आपला उपक्रम नित्यनेमाने चालू ठेवला. प्रत्येक अक्षय्य तृतीयेला तो दान करू लागला. त्याला जीवनात कशाचीही कमतरता पडली नाही. त्याला जीवनात अक्षय आनंदाची प्राप्ती झाली.

या कथेमागचा हेतू अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान केले तर अक्षय सुखसमाधानाची प्राप्ती होते असा आहे.

दानाचे महत्त्व

भारतीय संस्कृतीमध्ये दान देण्याला विशेष महत्त्व आहे. ज्याच्याजवळ आहे त्यांनी ज्याच्याजवळ नाही त्याला देऊन मदत करणे हा दान देण्यामागचा हेतू आहे. ‘दानम्हणजे डोनेशन नव्हे! डोनेशन देताना देणाऱ्याचे नाव, काय डोनेट केले आहे ते जाहीर केले जाते. एव्हढेच नव्हे तर तसा फलकही लावला जातो. परंतु दान कोणी दिले आणि काय दान दिले या दोन्ही गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू नये, असे म्हटले जाते. दान दिल्याने पुढच्या नव्हे याच जन्मात समाधानाचे, कृतार्थतेचे पुण्य मिळते.