उपनयन संस्कार

सगळ्यांना माहित असलेला उपनयन संस्कार. पहिला जन्म आई वडिलांपासून होतो आणि उपनयनात गायत्रीचा उपदेश करणारे आचार्य म्हणजे पिता व गायत्री हि माता यांच्या पासून दुसरा जन्म होतो. या उपनयनाला व्रतबंध असे म्हणतात. ब्रह्मचर्य व्रताचे ग्रहण करावयाचे असते म्हणून व्रतबंध म्हणतात. मुंज या वनस्पतीपासून दोरी तयार करवुन ती कंबरेला बांधली जाते म्हणून मौजीबंधन म्हणतात. हा उपनयन संस्कार म्हणजे दुसरा जन्म आहे. पहिला जन्म जरी आपल्या हाती फारसा नसला तरी दुसरा जन्म आपल्या हाती नक्कीच आहे. हा दुसरा जन्म योग्य वेळी व योग्य मुहूर्तावर व्हावा या करीत शास्त्रकारांनी काही बंधने घातली आहेत. उपनयन म्हणजे वेदांचा आरंभ असल्याने वेदाध्ययनाकरिता ज्या तिथी वर्ज्य करावयास सांगितल्या आहेत, त्या तिथी उपनयनाकरिता वर्ज्य सांगितल्या आहेत. तसेच उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस असतो. म्हणून उत्तरायण असताना मुंज करावी. मुहूर्त शास्त्राप्रमाणे इतरही गोष्टी उपनयनासाठी पहिल्या जातात. आपल्याला प्रत्येक कर्मामध्ये प्रधान कर्म कोणते हे सांगितलेले असते. जसे संध्ये मध्ये अर्ध्यप्रधान हे प्रधानक्रम आहे तसे उपनयनामध्ये गायत्री उपदेश करणे हे प्रधानक्रम आहे. हा गायत्रीचा उपदेश देण्याचा अधिकार प्राप्त होण्याकरिता जो उपदेश देणारा आहे त्याने गायत्रीचा १२ हजार जप करावा. बटूने सुद्धा काही प्रायश्चित घेऊन मग हा गायत्रीमंत्र ग्रहण करावा.